24 Hours Orthopaedic Emergency & Ambulance Service:  +91 8806080066

Call Us Now

8806080066
9960033312

Infinity Hospital

Badade nagar, Khode Mala, Nashik -422008

Open 24x7x365

For Emergencies
8007739399

Call Us Now

8080771675 / 8806080066

Infinity Hospital

Badade nagar, Khode Mala, Nashik -422008

Open 24x7x365

For Emergencies

“चलता है” मुलगा, क्रिकेटचा बॉल आणि आईचा फुल HD मेंदू

सकाळी साधारण अकरा वाजता शाळेतून फोन आला.
शाळेचा फोन म्हणजे आईच्या हृदयासाठी दोनच शक्यता
एकतर मुलाने मेडल जिंकलं आहे….
नाहीतर आईच्या कल्पनाशक्तीला फुल HD क्वालिटी मिळणार आहे.
फोनवर मॅडम म्हणाल्या “मॅडम, हृदयला क्रिकेटचा बॉल हाताला लागलाय.”
बस्स!
त्या क्षणी माझ्या मेंदूत
ब्रेकिंग न्यूज, स्क्रोलिंग न्यूज आणि पॅनेल डिस्कशन तिन्ही सुरु झाले.
कारण हृदय हा माझा चौदा वर्षांचा मुलगा…
आणि त्याची एक खासियत आहे
नख निघालं तरी म्हणेल –
“चलता है.”
पाय चणकला तरी
“चलता है.”
हा मुलगा इतका सोशिक आहे की कधी कधी वाटतं दुखण्याने त्याच्याकडे अर्ज टाकला असेल
“भाऊ…. आम्हालाही थोडं महत्त्व दे.
आम्हालाही थोडं दुखू दे!”
वरून ब्लॅक बेल्ट कराटे.
म्हणून दुखणं आणि तो –
दोघांचं नातं थोडंसं लाँग डिस्टन्स रिलेशनशिप सारखं.

मन चिंती ते वैरी न चिंती
मी लगेच त्याच्याशी फोनवर बोलले.
“काय दादा, दुखतंय का?”
तो म्हणाला
“दुखत नाही… पण बोट हलत नाही.”
बस्स!
त्या एका वाक्याने माझ्या मेंदूत
ऑर्थोपेडिक कॉन्फरन्स सुरु झाली.
फॅक्चर…
हेअरलाइन फॅक्चर…
स्प्लिंट…
प्लास्टर…
ऑपरेशन…
थोडक्यात –
हृदयचा हात दुखला होता…
पण ऑपरेशन मी मनात करून आले होते.

फोनवरील इमर्जन्सी मीटिंग
मी लगेच मिस्टरांना फोन केला.
फोनवरच इमर्जन्सी डिस्कशन सुरु झालं. घरात नसलेली मेडिकल कमिटी फोनवर बसली होती.
एक जण म्हणतो
“एक्स-रे काढूया.”
दुसरा म्हणतो –
“ऑर्थोपेडिकला दाखवूया.”
आणि तिसरा… म्हणजे माझा मेंदू म्हणतो
“फॅक्चर… स्प्लिंट… प्लास्टर…. गरज पडली तर ऑपरेशनही!”
गंमत म्हणजे मी
Crime Patrol किंवा CID
अशा मालिका बघतही नाही.
पण त्या क्षणी माझी कल्पनाशक्ती इतक्या वेगाने धावायला लागली की वाटलं
जर मी त्या मालिका बघायला लागले, तर Crime Patrol चे लेखक नोकरी सोडून माझ्याकडे इंटर्नशिप करायला येतील !
आईचा मेंदू हा एक वेगळाच प्रकार असतो.
तिथे एकाच वेळी
Google Search चालू असतं….
YouTube Tutorial चालू असतं….
Breaking News चालू असते….
आणि सगळ्यात महत्त्वाचं
“Worst Case Scenario” नावाचा एक खास टीव्ही चॅनेल २४ तास सुरू असतो!

स्पेशालिस्टचा शोध
आजकाल डॉक्टरांचं जग फार मजेशीर झालं आहे.
पूर्वी आजारी पडलं की लोक म्हणायचे
“डॉक्टरकडे जाऊ.”
आता म्हणतात
“कोणत्या डॉक्टरकडे जाऊ?”
डोळा लागला आय स्पेशालिस्ट.
दात दुखला – डेंटिस्ट.
हात लागला ऑर्थोपेडिक.
बोट लागलं कदाचित हँड स्पेशालिस्ट.
म्हणजे आता परिस्थिती अशी झाली आहे की -माणूस आधी स्पेशालिस्ट शोधतो…. आणि नंतर आजार शोधतो !
मी मनात विचार करत होते –
हात आहे…
बोट आहे…
क्रिकेट आहे…
कराटे आहे…
थोडक्यात
हातापेक्षा डॉक्टरांची लिस्ट मोठी होत होती.
आणि त्या क्षणी मनात एक भन्नाट विचार आला जर कल्पनाशक्तीसाठी स्पेशालिस्ट असता, तर त्या दिवशी मला थेट
“इमॅजिनेशन स्पेशालिस्ट” कडे अॅडमिट करावं लागलं असतं!
शेवटी आम्ही ठरवलं जायचं डॉक्टर वराडे यांच्याकडे.
त्यांचं इन्फिनिटी हॉस्पिटल जवळच.

एक्स-रेचा थरार
एक्स-रे काढला.
तोपर्यंत माझ्या मनात
मेडिकल सस्पेन्स थ्रिलर सुरूच होता.
मी तर मनात तयारी केली होती-आज कदाचित ऑपरेशन…
रात्रभर हॉस्पिटल…
कदाचित अॅडमिट…
थोडक्यात
हृदयला बॉल लागला होता,
पण अॅडमिशन मी मनात घेतलं होतं.
रिपोर्ट आला.
डॉक्टर वराडे शांतपणे म्हणाले “मॅडम, फॅक्चर नाही. हेअरलाइन फॅक्चरही नाही. स्प्लिंट,
ट्रिगर किंवा कास्टची गरज नाही.
फक्त थोडा आराम द्या.”
त्या क्षणी जीव भांड्यात पडला.

पण खरी वेदना कुठे होती?
माझा जीव भांड्यात पडला…
पण हृदयचा चेहरा मात्र थोडा पडलेला दिसत होता.
मी विचारलं –
“काय रे, अजून दुखतंय का?”
तो म्हणाला –
“दुखत नाही…
पण आता १०-१२ दिवस पियानो, कीबोर्ड किंवा गिटार वाजवता येणार नाही.”
आणि त्या क्षणी मला जाणवलं –
त्याला बोट दुखत नव्हतं….
त्याला संगीत थांबण्याचं दुःख होत होतं.
अभ्यास थांबला असता तर तो कदाचित म्हणाला असता –
“चलता है.”
पण
संगीत थांबणं मात्र ‘चलता है’ नव्हतं.
त्या क्षणी मला वाटलं –
हाताला बॉल लागला होता…
पण मनाला ‘संगीताची सुट्टी लागली होती.

घरी परतल्यावर
घरी येताना मी फोनवर फक्त एवढंच सांगितलं होतं –
“हात दाखवायला चालले आहे.”
घरी आल्यावर आर्जीनी हृदयला विचारलं
“काय रे, लागलं होतं ना….
मग हात दाखवायला का गेला?”
हृदय दोन सेकंद विचार करून म्हणाला –
“गुरुर्जीकडे जायची हीच वेळ होती का?”
क्षणभर शांतता… आणि मग घरात
पु. ल. देशपांडे यांच्या नाटकातल्या टायमिंगसारखा हशा।

कारण खरंच –
“हात दाखवायला जाणं”
या वाक्याचे मराठीत अनेक अर्थ असतात !

शेवटचा विचार
त्या दिवशी मला एक गोष्ट कळली
क्रिकेटचा बॉल
हृदयच्या हाताला लागला होता….
पण फॅक्चर –
माझ्या कल्पनाशक्तीचं झालं होतं.

आणि एक्स-रे नॉर्मल आल्यानंतर डॉक्टर वराडे यांनी हृदयला नाही…
माझ्या मेंदूलाच डिस्चार्ज दिला।


डॉ. स्मिता पवार
नेत्ररोग तज्ञ

MS-Ophthalmology, DOMS,
FCPS Gold Medalist, Mumbai

Infinity Hospital
is a 50 bedded NABH (entry-level) & QCI accredited hospital with state-of-the-art-infrastructure and a team of highly trained specialists and professionals in Nashik, Maharashtra. It is our immense pleasure to share successful completion of one year of services by Dr. Poonam Varade.

Contact Details

Make An Appointment

Infinity Hospital © All rights reserved. Developed by OMX Technologies
Scroll to Top